Wednesday, February 1, 2012

सहचरी : प्रस्तावना


सहचरी ही कादंबरी महाभारतातल्या वनपर्वातील नल-दमयंती ह्या आख्यानावर आधारित आहे. ह्या कादंबरीला मूळ कथेचा मनचाहा विस्तार म्हणता येईल. सहचरीची कथा नलाच्या बालपणापासून प्रकाशाच्या राज्याकडे वाटचाल करणाऱ्या त्याच्या जीवनाची कथा आहे. त्याच्या वाढणाऱ्या वयाबरोबर वाढणाऱ्या अनुभवांची कथा आहे. हे अनुभव त्याला जीवनातल्या जगण्याचा अर्थ कसा शिकवतात याची कथा आहे. त्याच्या राजसी व्यक्तिमत्वापेक्षा त्याच्या गृहस्थ जीवनाची कथा आहे.
सहचरीचे मुख्य पात्र नल. अनेक वरदानांचा धनी असलेल्या नलाला त्या वरदानांविषयी अहंकार नाही. म्हणूनच कदाचित पुत्र, पती, पिता, बंधू आणि सखा ही सर्व नाती तो आत्मीयतेने संभाळतो. पुत्र आणि पिता ही नाती संभाळताना तो अतिशय हळवा आहे. आपल्या बंधुसाठी तो उदार आहे. त्याच्या हातून घडलेल्या दुष्कृत्याचा दंड तो त्याला देत नाही. कारण त्याला माहीत आहे की बंधुच्या कृतीमागे कलीचा हात होता. सखा म्हणून वावरताना तो मित्रता ह्या शब्दाची व्याख्या चांगल्या प्रकारे जाणतो. आपल्या मित्राच्या एका आलिंगनासाठी तो राज्यारोहणाचा दिवस पुढे ढकलतो.
सर्वात महत्वाचे पतीचे नाते संभाळताना नलाच्या विविध वागण्याचे पैलू म्हणजे ही कादंबरी असे म्हणता येईल. दमयंतीच्या रुपात त्याने काय मिळवले होते? ती त्याच्या अंतरंगातली असीम सुंदरता होती. त्याच्या भावनांना संभाळणारी त्याची सखी होती. ती आज मिळाली असे नव्हते. युगानुयुगे त्याचा हात धरून जीवन पथावरून चालत येणारी ती त्याची प्रिय सहचरी होती.
जीवन जगताना नलाचे स्वतःचे विचार आहेत. युद्धात अजय असलेल्या त्याला आपल्या हातून घडलेल्या चुकांची जाणीव आहे. त्यावर पांघरूण घालायची त्याची वृत्ती नाही. चुकांमुळे आलेल्या संकटांना झेलायला तो तयार आहे. कलीच्या शापातून बाहेर पडल्यावर तो जेव्हां आपल्या पत्नीला भेटतो तेव्हां आपले मन तिच्यापुढे उघडे करताना तो तिला म्हणतो, "प्रिये, जे घडले तो नियतीचा लेखा होता. मला त्या विषयी काही म्हणायचे नाही. ह्या नियतीने मला प्रिय-अप्रिय, सुख-दुःख, भूत-भविष्य साऱ्यांना सहज रुपाने झेलायला शिकवले आहे. त्यामधे स्थिर रहायला शिकवले आहे. तुझ्या सहवासात मी स्वतःला पूर्ण पुरुष समजत असे. तुझ्यापासून दूर झाल्यावर पूर्णत्वाचा खरा अर्थ मला समजू लागला. नियतीने तो अर्थ समजण्याची दिशा आणि मार्ग मला दाखवला आहे."
नलाच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांमधे त्याच्या पत्नीची, इतर नातेवाईकांची आणि सहकाऱ्यांची साथ आहे, कथा आहे आणि व्यथा सुद्धा आहे.
सहचरीचे दुसरे मुख्य पात्र दमयंती. राजकुमारी दमयंतीची असामान्य सुंदरी म्हणून कीर्ती असली तरी, नल पत्नी दमयंती ही इतर स्त्रियांप्रमाणे आपल्या पतीवर, मुलांवर, घरादारावर प्रेम करणारी, त्यात रमून गेलेली स्त्री आहे. ती आपल्या पतीची भाग्यलक्ष्मी आहे. पतीच्या कर्तृत्वावर विसंबलेली ती त्याची गृहलक्ष्मी आहे. तिचा पती सुरवातीला द्युत खेळण्यात रमून जातो याचे तिला फारसे वावगे वाटत नाही. तो जेव्हां खेळण्याच्या मर्यादा तोडून त्याच्या आहारी जातो तेव्हां ती आपले सामान्यत्व सोडून असामान्यतेकडे वाटचाल चालू करते. ही वाटचाल केवळ नियतीचा लेखा म्हणून ती स्वीकारत नाही तर डोळे उघडे ठेवून चालत असते. अशा परिस्थितीत महाराणीचा अधिकार वापरून ती आपल्या लहान मुलांना निषध बाहेर काढते. कन्या होण्याचा अधिकार वापरून त्यांना, त्यांचे सेवक, इतर सामान आणि नलाचा दिव्य रथ यासह आपल्या पित्याकडे पाठवते. पत्नी होण्याचा अधिकार वापरून ती आपल्या पतीच्या पडत्या काळात त्याच्या जवळ रहाते. महामंत्रींनी तिच्यासाठी म्हणून देवू केलेली मदत नाकारताना ती त्यांना सांगते, "इथून बाहेर पडल्यावर आमचा शोध घ्यायचा नाही. चूक महाराजांनी केली आहे. उत्तर त्यांनाच शोधू द्या. ज्यावेळी त्यांना उत्तर सापडेल त्यावेळी ते निषध अवश्य जिंकतील. राहिली माझी गोष्ट. महामंत्री, ह्या पृथ्वी लोकाची कथा अशी आहे की, वसंत कितीही सुखावह वाटला तरी ग्रीष्माची तपिश सहन केल्याशिवाय जीवनदायीनी वर्षा येत नाही. माझी चिंता करू नका. आर्यपुत्रांसारखा प्रेमळ पती जवळ असल्यानंतर चिंतेचे कारण नाही."
दमयंतीचे चरित्र नलाच्या सावलीत वावरत असले तरी त्याला एक वेगळे असे स्वतःचे अस्तित्व आहे. ती उषःकालिन मंगल सुहासिनी आहे. शरदऋतुतली शालीनता आहे. वसंतातली कामायनी आहे.  एका रमणीय स्वप्नातली मोहिनी आहे. आणि ह्या सर्वांबरोबर ती नलाच्या मन मंदिरातली प्रियदर्शनी आहे.
सहचरीच्या कथानकाला वाढवण्याचे काम अनेक पात्रांनी केले आहे. मुळात ही कथा नल दमयंतीच्या गृहस्थ जीवनाची कथा आहे. ह्या कथेचे तिसरे सशक्त पात्र आहे संदेशवाहक राजहंस 'प्रचेता'.
संस्कृत साहित्यात मानवाला उत्क्रांतीकडे नेणारा आणि शुभ समजला जाणारा राजहंस हा महाभारतातल्या आख्यानात सुरवातीला संदेश वाहकाचे काम करून निघून जातो. सहचरीमधे नल दमयंतीचे आपसी प्रेम हा एक धागा आणि संदेशवाहक राजहंस 'प्रचेता' हा दुसरा धागा ह्या दोन धाग्याने सहचरीचे कथानक गुंफले (विणले) आहे.
सहचरीचे कथानक हिमालयातील मानसरोवरावरच्या हंस राज्यात 'प्रचेताच्या' जन्मापासून सुरू झाले. हा राजहंस 'प्रचेता' नलाचा आणि पुढे दमयंतीचा खऱ्या अर्थाने सखा झाला आहे. नलाची आणि त्याची मित्रता कदाचित अनेक जन्माची आहे. कैलास मानसरोवरा सारख्या पवित्र वातावरणात लहानाचा मोठा झालेला प्रचेता भौतिक पातळीवर जरी एक पक्षी असला तरी नलाला दिव्यत्त्वाची जाणीव करून देणारा तो त्याचा मार्ग दर्शक आहे. जीवनाच्या उतारा पर्यंत त्याची नलाला साथ आहे.
हचरीमधे असलेला चौथा कोन म्हणजे कली. हा खलनायक असला तरी मानवी जीवनामधे त्याची भूमिका महत्वाची आहे. तो नलाच्या चरित्राला छन्नी हातोड्याने ठोकून मूर्तीचा आकार देतो. त्याच्या कर्तुतिने नलाचे मन रक्तबंबाळ होते. अर्थात त्या जखमा झेलून तो जीवन जगण्याचा अर्थ शिकतो. त्याच्याच कर्तुतिने दमयंतीला नलाच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःची अस्मितेची ओळख होते.
सहचरीचे कथानक मनामधे आकार घेताना एक अडचण लक्षात आली. पुराणातील राजा नलासह सर्व राजे-महाराजे अंग उप अंगासहित वेद वेदांताचे जाणते होते. वेदांचे प्रत्यक्ष वाचन केल्याशिवाय नलाचे चरित्र उभे रहाणार नाही हे लक्षात आले. 'शांतीकुज हरिद्वार' यांचे प्रकाशित चारी वेद वाचले. वेदांच्या पाठोपाठ उपनिषद आले. त्यांचा विस्तार म्हणून काही पुराणे वाचून काढली. नलाच्या चारित्र्याची रूपरेखा तयार झाली. त्या काळात प्रत्येक राजा वेगवेगळे यज्ञ करत असे. त्यात अश्वमेध प्रमुख असे. यजुर्वेद वाचताना अश्वमेधाचे महत्व कळले. माझ्या कुवतीप्रमाणे कथेतल्या अश्वमेधाला अर्थ मिळाला.
आता थोडेसे सहचरी या नावाविषयी.
पुराण कथेतले सर्वच राजे आपापल्या परीने शूर-वीर असतात. तरीही द्रौपदी शिवाय महाभारत आणि सीतेशिवाय रामायण घडू शकत नाही, त्याच प्रमाणे दमयंती शिवाय नलाच्या चरित्राची महती नाही. कदाचित अर्थ नाही. दमयंती त्याची सर्व अर्थाने सहचरी आहे. त्याच्या अस्तित्वाचा अर्धा भाग आहे. दमयंतीच नव्हे तर प्रत्येक स्त्री ही आपल्या पुरुषाची सहचरी असते. 'तिच्या कोमल भावविवशतेला हाताशी धरल्या शिवाय कोणत्याही पुरुषाच्या पुरुषार्थाला अर्थ आहे का?' असे म्हणणे चुकीचे नसावे.
कोणाच्याही जीवनाचा मार्ग खडतर आहे अथवा सुखद आहे हे ठरवण्याचे कुठलेही प्रमाण नाही. पुरुषासाठी त्याची स्त्री त्याच्या पराक्रमाला--पुरुषार्थाला पेलून धरणारी असली आणि स्त्रिसाठी तिचा पुरुष तिच्या भावविवशतेला संभाळणारा असला तर दोघांसाठी तो मार्ग सहज होतो. ह्या एका विचाराच्या आधारावर सहचरीचा जन्म झाला.
कौमुदी प्रताप