Friday, January 13, 2012

लोकापवाद रामायणातला -- एक विचार -- भाग ४

     यज्ञ स्थळाच्या सभागृहात यज्ञासाठी आलेले सर्व उपस्थित जमले होते. भरलेल्या त्या सभागृहात तिन्ही राजमाता आपल्या स्थानावर बसल्या होत्या. आपल्या ज्येष्ठ पुत्रवधूला पहाण्यासाठी उत्सुक होत्या. रघुवंशांच्या छोट्या अंकुरांना आपल्या जवळ घेण्यासाठी अधीर होत्या. अनेक सुख-दुःख त्यांनी अनुभवले होते. तरीही आज त्यांचे मन हळवे झाले होते. काही क्षणात अयोध्येचे महाराज मंडपात येत असल्याची सुचना आली. सारा मंडप शांत झाला. कुलगुरू वशिष्ठांना आणि आपल्या मातांना प्रणाम करून राजाने आसन ग्रहण केले. त्याने आपल्या दूताला वाल्मिकी ऋषींना आदराने मंडपात आणण्या विषयी सांगितले. दूत निघून गेला.
     अयोध्यच्या राजा आसनावरून उठून सर्व उपस्थितांच्या समोर हात जोडून त्यांना म्हणाला, "यज्ञाला उपस्थित असलेल्या सभाजनांना मी काही सांगू इच्छितो. यज्ञाला उपस्थित असलेल्या महर्षी वाल्मिकींबरोबर अयोध्यची महाराणी ह्या सभास्थानी येत आहे. आपली शुद्धता प्रमाणित करण्यासाठी ती इथे शपथ ग्रहण करणार आहे. तुम्ही सर्वांनी ह्या शपथ ग्रहणाचे साक्षी असावे अशी माझी इच्छा आहे. रावण वधानंतर तिने लंकेमधे अग्नी परीक्षा दिली होती. अयोध्येच्या प्रजाजनांचा त्यावर विश्वास नव्हता. आता स्वतः ह्या शपथ ग्रहणाचे साक्षी होवून त्यांनी तिची शुद्धता मान्य करावी."
     सारी सभा काही बोलता शांतपणे राजाचे बोलणे ऐकत होती. वाल्मिकी ऋषींच्या चालताना होणाऱ्या खडावांचा आवाज त्या शांततेला भंग करून गेला. सगळ्यांची दृष्टी येणाऱ्या ऋषींकडे वळली. त्यांच्या बरोबर त्यांचे चार शिष्य आणि दोन कुमार होते. चालणाऱ्या सर्व नाट्याचे कुमारांच्या मनावर दडपण होते. त्यांच्या जन्माचे रहस्य त्यांच्या समोर आले होते. आपण एका श्रेष्ठ राजवंशात जन्मलो असून समोर सिंहासनावर बसलेला पुरुष त्यांचा पिता आहे. त्याचे चरित्र त्यांना माहीत होते. ह्याच यज्ञमंडपात त्यांनी त्याचे गायन केले होते. ह्या सर्व गोष्टी पेलायला किशोर वयातले त्यांचे मन अजून रिपक् झाले नव्हते. सारी सभा त्या दोघांकडे प्रम भरल्या दृष्टीने पहात होती. तिन्ही राजमाताची दृष्टी कुमारांवरून हलत नव्हती. कुमारांकडे पहाणाऱ्या सर्व सभेच्या ही  गोष्ट लक्षात आली नाही की त्यांच्या राजाच्या नेत्रातून दोन अश्रूबिंदू धरतीवर पडून तिच्यामधे समावले. कुमारांच्या नेत्रांकडे पहाण्याची शक्ती त्या अश्रुभरल्या नेत्रांमधे नव्हती. क्षणभरात भानावर येवून ऋषींना अभिवादन करण्यासाठी दोन्ही हात जोडून तो आपल्या आसनावरून उठला. ऋषींनी राजाला आशीर्वाद दिला. काहीसे त्याला आणि काहिसे सभाजनांना उद्देशून ते म्हणाले, "राजा, तुझे कल्याण असो. तुझ्या पत्नीने शुद्धता प्रमाणित करण्यासाठी शपथ ग्रहण करावी असा संदेश काल तू पाठवला होता. राजा, तुझी पत्नी तुझ्या इच्छेसाठी शपथ ग्रहण करण्यास तयार आहे. तिने शपथ घेण्याआधी मी काही सांगतो ते तू ऐकून घे.
      गर्भवती असलेली तुझी पत्नी, परित्यक्ता अवस्थेत अत्यंत करूणापुर्वक विलाप करताना मला गंगा किनारी सापडली. तिची अवस्था पाहून मी तिला सान्त्वना दिली आणि आपल्या आश्रात घेवून गेलो. राजा, माझ्या तपाच्या तेजामुळे कुठलेही काया, वाचा, अथवा मनाने केलेले पाप माझ्या आश्रमात प्रवेश करू शकत नाही हे सत्य लक्षात घे. माझ्या पवित्र आश्रमात काही साध्वी स्त्रियांबरोबर रहात असताना तुझ्या पत्नीने दोन जुळ्या पुत्रांना जन्म दिला. राजा, तुझ्या चारित्र्याचे गायन करणारे हे दोन कुमार तुझेच पुत्र आहेत हे माझ्या तपश्चर्येची शपथ घेवून मी सांगतो. त्याचप्रमाणे तुझी पत्नी गंगाजला इतकी निर्मल आणि पवित्र आहे हे ाझे सांगणे ऐकून घे. काही साध्वी स्त्रियांबरोबर ती सभामंडपाच्या द्वाराशी उभी आहे."
      ऋषींचे बोलणे संपल्यावर त्यांचा एक शिष्य मंडपाच्या द्वाराकडे निघाला. त्यावेळी सभेतल्या सर्वांना जाणवले निसर्गात काहीतरी बदल होतो आहे. एकदम मनाला शितल करणारे वारे वाहू लागले. त्या वाऱ्याच्या गतीने आसपासचे वृक्ष डुलू लागले. वेगळ्या तरंग लहरींनी सर्वांना वेढले. निसर्गातल्या ह्या बदलाचा त्यांना नेमका अर्थ कळेना. त्याचवेळी वाल्मिकींचा शिष्य  अयोध्येच्या महाराणीला काही साध्वी स्त्रियांबरोबर सभामंडपात घेवून आला. राजासह सारे सभाजन तिच्याडे पहात राहिले. जणू काही रघूकुलाची तपस्या, सत्यवचन, वचनपुर्ती मुर्त रूप धारण करून  भगव्या वस्त्रात चालत आहे असा त्यांना भास झाला.
      अयोध्येची महाराणी कुठेही पहात नव्हती. दोन्ही हात जोडून खाली मान घालून सावकाश पावले टाकत ती वाल्मिकी ऋषींच्या जवळ आली. त्यांना वंदन करून ती शांतपणे उभी राहिली. सभागृहात रघूवंशाचे कुलगुरू कुठे बसले आहेत हे तिला माहीत नव्हते. राजमाता कुठे बसल्या आहेत हे तिला माहीत नव्हते. तिने त्यांना मनोमन वंदन केले. अयोध्येचा राजा असलेल्या आपल्या पतीकडे मान उचलून पहावे असे तिला वाटत नव्हते. तो सतत तिच्या हृदयात होता. त्याला बाहेर शोधावे असे तिला वाटत नव्हते.
      आपल्या आसनावर बसलेला अयोध्येचा राजा तपश्चर्येने तेजाळलेल्या आपल्या पत्नीच्या रुपाकडे पहात होता. लंकेमधे अग्निपरीक्षे नंतर अग्नीतून बाहेर पडून संथ पावले टाकत आपल्याकडे येणारे तिचे रूप त्याच्या डोळ्यासमोर दिसत होते. तिला वाल्मिकी ऋषींच्या जवळ थांबलेले पाहून तो एकदम भानावर आला. आपल्या आसनावरून तो सावकाश उठून उभा राहिला. त्याने आपल्या पत्नीकडे एक कटाक्ष टाकला. एकदा तरी तिने आपल्याकडे पहावे, आपल्या मनातले तिच्या विषयीचे प्रेम, आदर, व्यथा तिला कळावी अशी त्याची इच्छा होती. त्याची इच्छा त्याच्या मनात राहिली. अयोध्येची महाराणी अजूनही खाली मान घालून उभी होती. भरल्या सभागृहात आपल्या पतीकडून शपथ ग्रहणासाठी आज्ञेची प्रतीक्षा करत होती. प्रतीक्षा करणाऱ्या तिच्या कानावर तिच्या पतीचे शब्द पडले.
      अयोध्येचा राजा हात जोडून महर्षी वाल्मिकींना म्हणत होता. "ऋषीवर, तुम्ही माझ्या पत्नी विषयी जे काही सांगितले ते इथे उपस्थितांनी ऐकले आहे. माझ्या पत्नीची शुद्धता मला माहीत आहे. मागे लंकेमधे अग्नी प्रवेश करून तिची शुद्धता तिने प्रमाणित केली होती. एवढे असून सुद्धा अयोध्येत आल्यावर तिच्या लंकेतल्या वास्तव्यावरून प्रजेच्या मनात शंका आली होती. प्रजेच्या समाधानासाठी मला त्यावेळी तिला सोडावे लागले होते. ऋषीवर, ह्या यज्ञाच्या निमित्ताने इथे अनेक तपस्वीजन, राजे-महाराजे, इतर प्रजाजन जमले आहेत. ह्या सगळ्यांच्या उपस्थित जर तिने आपली शुद्धता पुन्हा एकदा प्रमाणित केली तर मी प्रसन्नतेने तिचा स्वीकार करीन."
      वाल्मिकी ऋषींनी अयोध्येच्या महाराणीला शपथ ग्रहणाविषयी विनंती केली.
      तेजाची शलाका असलेल्या अयोध्येच्या महाराणीने क्षणभर विचार केला. 'आर्यपुत्र, तुम्हाला माहीत आहे मी शुद्ध आहे, तरी सुद्धा माझी परीक्षा घेता आहात. या पुढे ही वेळ मी तुमच्यावर येवू देणार नाही. माझी परीक्षा घेणे तुम्हाला किती कष्टदायक आहे हे माझ्याशिवाय दुसरे कोण समजणार?' मनाला स्थिर करून अयोध्येच्या महाराणीने शपथ उच्चारायला सुरवात केली. मंद मंद वहाणारा वारा शपथ ऐकण्यासाठी थांबला. धीर गंभीर आवाजात अयोध्येची महाराणी शपथ उच्चारत होती. "हे दश दिशांना वास करणाऱ्या देवता, गंधर्व, यक्ष, किन्नर, ज्या पंच तत्त्वातून हे विश्व निर्माण झाले ते पंच तत्त्व, इथे उपस्थित असलेले तपस्वी ऋषीगण, तसेच इतर प्रजाजन, मी रघूवंशाची राजस्नुषा, स्वर्गवासी महाराज दशरथांची पुत्रवधू, अयोध्येचे महाराज श्रीराम यांची पत्नी शपथ घेते की, मी कधीही परपुरुषाचा विचार केला नसेल तर, माझ्या चारित्र्याला लागलेला कलंक जर मिथ्या असेल तर, आणि या, वाचा, मनाने मी केवळ आपल्या पतीचा विचार करत असेन तर, हे धरतीमाता मला आपल्या उदरात स्थान दे. हे माता तुझ्या उदरातून माझा जन्म झाला आहे. माझी शुद्धता प्रमाणित करण्यासाठी मला तुझ्यामधे सामावून घे."
      अयोध्येच्या महाराणीच्या मुखातून हे शब्द निघताच सारे वातावरण थरारले. एक कडाडता आवाज सगळ्यांना ऐकू आला. शपथ घेणाऱ्या महाराणी जवळची पृथ्वी दुभंगली. रत्नखचित आसनावर बसलेली धरणी माता वर आली. प्रसन्न मुखाने तिने आपल्या पुत्रीला आपल्या जवळ घेतले. प्रेमभराने तिचा माथा चुंबून तिला आपल्या जवळ आसनावर बसवून घेतले. त्यावेळी एक दिव्य तेज सगळीकडे पसरले. त्या तेजाने तिथे असलेल्या सर्वांनी आपले डोळे झाकून घेतले. सिंहासनावर बसलेल्या अयोध्यापतीच्या जवळ येवून ते तेज त्याच्यामधे समावताना ते तेज त्याला म्हणाले. 'प्रभू, ह्या जन्मात एक रूप घेवून मी तुमच्या सानिध्यात राहू शकले नाही. पुढच्या जन्मात अनंत रूप घेवून मी तुम्हाला वेढून टाकीन. तुमचा दूरावा मला सोसावा लागणार नाही. आता मर्त्यलोकातून जाण्याची आज्ञा द्या.'
      ह्या शब्दांचा आभास होताच राजाने चमकून धरणीमाते बरोबर पृथ्वीच्या उदरात जाणाऱ्या आपल्या पत्नीकडे पाहून आवाज दिला, "थांब सीते. अशा रीतीने तू जावू शकत नाही. तुझी शुद्धता प्रमाणित झाली आहे. हे अयोध्येच्या महाराणी, परत ये."
      राजाचे ते शब्द ऐकून सर्व उपस्थितांनी डोळे उघडून पाहिले. आपली शुद्धता प्रमाणित करून अयोध्येची महाराणी पृथ्वीच्या उदरात जात होती. डोळ्याची पापणी लवते नाही एवढ्या वेळेत ती पृथ्वीमधे समावली. दुभंगलेली धरती पुन्हा पहिल्यासारखी झाली. सगळीकडे कोलाहल माजला. ज्या वृक्षाखाली राजाचे आसन मांडले होते त्या वृक्षाची फांदी धरून राजा उभा होता. डोळ्यातून अश्रूंची धारा चालली होती. मुखातून शब्द उमटत होते, "सीते, हे काय केलेस?"
      थोड्या वेळात कोणीतरी त्याच्या खांद्यावर सान्त्वनापूर्ण हात ठेवला. राजाने वळून पाहिले. ती छोटी माता होती. तिच्याकडे पहात दुःखद स्वरात म्हणाला, "माता, मी तिला शुद्धता प्रमाणित करण्याचे सांगितले होते. तिने हे काय केले?"
      सगळ्या सभेचे लक्ष अश्रू ढाळणाऱ्या अयोध्येच्या राजाकडे लागले होते. शांत आवाजात छोटी माता त्याला सांगत होती. "राम, सीतेने तुझी इच्छा पूर्ण केली. ती आता पुन्हा परिक्षीत होणार नाही. अयोध्येच्या प्रजेचा विश्वास कसा धरावा ? ज्यांच्या ब्रह्मतेजाचे सामर्थ्य पाहून महर्षी विश्वामित्र तपश्चर्येला लागले त्या कुलगुरू वशिष्ठांनी सीतेला अयोध्येच्या महाराणी पदावर अभिषेक केला होता. कुलगुरुंना सीतेची अपवित्रता समजली नाही, ती अयोध्येच्या प्रजेला समजली. अयोध्येच्या प्रजेचा आपल्या कुलगुरुंच्या तश्चर्येवर विश्वास नाही. आज ऋषी वाल्मिकींनी तिच्या पावित्र्याची शपथपूर्वक ग्वाही दिल्यावर ह्या सभेतल्या एकाला सुद्धा असे म्हणावेसे वाटले नाही की, 'राजा, आमचा महर्षी वाल्मिकींवर विश्वास आहे. अयोध्येची महाराणी शुद्ध आहे हे आम्हाला मान्य आहे.' राम, महाराज जनक यांची कन्या, महाराज दशरथ यांची पुत्रवधू, णि लंकेमधे जावून रावणाला मारून विंध्याच्या दक्षिणेला स्वस्थ राज्याची स्थापना करून तिथल्या प्रजेला वैदिक संस्कृतीमधे आणून सोडणाऱ्या चक्रवर्ती राजा रामची पत्नी सीता, पुन्हा पुन्हा परिक्षित होण्याइतकी सामान्य नव्हती. तुझ्या पित्याने आणि मी ह्या संस्कृतीचे स्वप्न पाहिले नव्हते. तुझ्या प्रजेने शंकेचे बीज मनामधे धरून पुण्यमयी सीतेला सामान्य समजून अपमानीत केले आहे. ते शंकेचे बीज वृक्षात रूपांतरित होता नष्ट होण्यासाठी मी अयोध्येच्या धरतीला शाप देते की, 'राजा राम, तुझ्या नंतर ही अयोध्या निर्मनुष्य होईल."
     माता कैकेयीचा शाप ऐकून सारी सभा निःशब्द झाली. मातेला शांत करीत राम म्हणाला, "माता, शांत हो. तुझा क्रोध मी समजू शकतो. रावणाच्या बंदीवासात सीता आपले पावित्र्य संभाळू शकली. कोणा सामान्याच्या घरात ही घटना घडली तर समाजासाठी घातक आहे. दोष कुणाचा हे प्रजा पहात नाही. तिला फक्त घटनेचे परिणाम समजतात. माझी प्रजा त्रिकालदर्शी नाही. सामान्य आहे. माते ही गोष्ट तुला माहीत आहे. माझ्या प्रजेच्या वतीने मी तुझी क्षमा मागतो. तुझा शाप वाया जाणार नाही हे मला माहीत आहे. माते, काही बोलता सीता निघून गेली. शापाने ती परत येणार नाह. मी पुन्हा पुन्हा क्षमा याचना करून तुझ्याकडे उःशाप मागतो. त्यासाठी मी कुठलेही दिव्य करायला तयार आहे."
      आपल्या पुत्राच्या ह्या बोलण्याने छोटी राजमाताचा क्रोध थोडा शांत झाला. रामाला उद्देशून ती म्हणाली, "शाप देण्यामधे माझ्या पुण्याची समाप्ती झाली आहे. उःशापाची योजना ब्रम्हर्षी वशिष्ठ काळानुसार करतील."
XXX
      सीतेचे धरतीमधे प्रवेश करणे आणि राजमाता कैकेयीचा शाप ह्या सगळ्या प्रकारात सीतेचे दोन्ही पुत्र स्तंभित अवस्थेत उभे होते. त्यांना हाताला धरून वाल्मिकी मुनी राजाजवळ आले. त्याच्या हातात दोन्ही पुत्रांना सोपवून ते म्हणाले,
      "राम, तुझे वचन संभाळून सीता निघून गेली. तुझ्या दोन पुत्रांना आता तू संभाळ. माझ्या आश्रमात रहाताना तुझे पुत्र तुझ्या प्रमाणे युद्ध शास्त्रात निपुण झाले आहेत."
     अयोध्येच्या राजाचा अश्वमेध यथावकाश पार पडला. दान दक्षिणा घेवून ब्रह्मवर्ग तृप्त झाला. यज्ञाला आलेले सर्व राजे आपल्या स्थानाला निघून गेले. राजा राम अयोध्येला जाण्यासाठी निघाला. त्याच वेळी त्याच्या तिघी माता त्याच्या जवळ आल्या. ज्येष्ठ माता कौशल्या आपल्या पुत्राला म्हणाली, "राम, तुझा यज्ञ यशस्वीरित्या पार पडला. तुला तुझ्या पुत्रांची प्राप्ती झाली. तुझ्या गृहस्थ जीवनातली तृटी पुत्र प्राप्तीमुळे पूर्ण झाली. आता आम्हाला वानप्रस्थाची अनुमती दे. इथून जवळ असलेल्या महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात आम्ही आपले उरलेले जीवन व्यतीत करू. आता अयोध्येत पुन्हा प्रवेश करण्याची आमची इच्छा नाही. तुझ्या पित्याची वानप्रस्थात जाण्याची राहिलेली अपुरी इच्छा आम्ही पूर्ण करू."
      राजा आणि त्याच्या मातांमधे अनेक प्रकारची चर्चा झाली. अयोध्येमधे प्रवेश करण्यावर तिन्ही माता अटळ होत्या. कर्तव्यात बांधलेला राजा सुख दुःखाच्या पलीकडे गेला होता. त्याने मातांना वानप्रस्थाची अनुमती दिली.
     आपल्या पत्नीला धरतीला समर्पित करून तसेच मातांना वानप्रस्थाची अनुमती देवून आपले पुत्र आणि बंधू यांच्यासह अयोध्येचा राजा आपल्या राजधानीत परतला. राजाचे दोन पुत्र वनातल्या आश्रमातून निघून राजप्रासादात राहू लागले. वैभवयुक्त प्रासादात वावरताना एकच प्रश्न त्यांच्या मनात वारंवार उठत होता.
      "आपला जन्म एका श्रेष्ठ राजवंशात झाला आहे. आपले माता-पिता एवढे श्रेष्ठ आहेत. असे असताना आपल्या भाग्यात माता आणि पित्याचे प्रेम विभागून का?"
      कुमारांच्या प्रश्नाचे उत्तर प्रासादाच्या वैभवाला माहीत नव्हते.

XXX
समाप्त