Thursday, January 12, 2012

लोकापवाद रामायणातला: एक विचार भाग २

     आर्य सुमंत ऋषी वाल्मिकींच्या आवासात पोहोचले. त्यांनी नम्रपणे राजाचा संदेश ऋषींना ऐकवला. संदेश ऐकल्यावर ऋषींनी सुमंतना तिथेच थांबायला सांगून ते स्वतः तो संदेश अयोध्येच्या महाराणीला सांगण्यासाठी साध्वींच्या आवासात गेले. ऋषींकडून आपल्या पतीचा संदेश ऐकल्यावर अयोध्येची महाराणी हात जोडून खाली मान घालून शांतपणे उभी राहिली. क्षणभराने भानावर येवून ती म्हणाली, "ऋषीवर, मी परित्यक्ता स्त्री, आज अनेक वर्षांनी आपल्या पतीकडून अशा प्रकारचा संदेश ऐकते आहे. पतीने सोडल्यावर तुमच्या छायाछत्राखाली मी सुरक्षित जीवन व्यतीत केले आहे. माझ्यासाठी, माझ्या पुत्रांसाठी काय योग्य, काय अयोग्य, हे तुम्हाला माहीत आहे. मी तुमच्या आज्ञेबाहेर नाही. तुम्ही जसे सांगाल तसेच वर्तन मी करीन."
      ऋषीवर तिच्या शांत मुद्रेकडे पहात राहिले. "मला वाटते तुझ्या पतीचे सांगणे तू ऐकावेस. उद्या मी स्वतः तुला यज्ञमंडपात घेवून जाईन. तिथे सर्व उपस्थितांसमोर तू तुझी शुद्धता प्रमाणित करावीस."
      "ऋषीवर, तुमचे सांगणे मला शिरोधार्य आहे. अयोध्येच्या महाराजांकडे तसा संदेश पाठवा."
     आर्य सुमंताकडून संदेश राजापर्यंत पोहोचला. राजाने आर्य सुमंतकडून सर्व यज्ञ प्रांगणात वार्ता पसरवली. 'उद्या सकाळी अयोध्येची महाराणी सर्व ऋषी-मुनी, राजे-महाराजे, इतर प्रजाजन ह्यांच्या समोर आपली शुद्धताप्राणित करणार आहे. सर्वांनी यज्ञ प्रांगणाच्या सभागृहात उपस्थित रहावे.'
      वार्ता सगळीकडे फिरता फिरता राजमातांच्या कानावर गेली. तिघी माता मोठ्या मातेच्या कक्षात एकत्र झाल्या. शुद्धता प्रमाणित होण्याच्या शपथ ग्रहणाविषयी तिघींच्या विचारात विषाद होता. 'एकदा दिलेली अग्निपरीक्षा प्रजाजनांनी मानली नाही. कलंक माथी घेवून तिला राज्य सोडावे लागले होते. आता दुसऱ्यांदा शपथ घेतल्यावर प्रजाजन भविष्यात काही म्हणणार नाही याची काय निश्चिती? राजा असलेल्या आपल्या पुत्राशी ह्या विषयी विचार विमर्श केला पाहिजे.' मोठ्या दोघी मातांचे म्हणणे होते, छोटीने पुत्राची भेट घ्यावी. ती बुद्धिमान आहे. राजकार्याची तिला जाण आहे. त्यांचे श्रेष्ठ पती राजकार्यातला कठीण गुंता तिला सांगत असत. आपल्या तेवढ्याच बुद्धिमान पुत्राला काही सांगायचे असेल तर ते तिला चांगले जमेल असे त्यांचे म्हणणे होते.
     यज्ञकुंडात सायंसंध्येच्या आहुती पडल्या. दिवसभराच्या कामातून निवृत्त होवून राजा आपल्या कुटिरात शांतीपूर्वक बसला असता छोटी राजमाता त्याला भेटायला आल्याचा संदेश मिळाला. त्याने उठून मातेचे स्वागत केले. तिची चरण वंदना केली. पुत्राला आशीर्वाद देत राजमाताने विचारले, "मी इथे अयोध्येच्या राजाला भेटायला आले आहे अथवा पुत्राला? हे कळले तर मला त्या प्रमाणे बोलता येईल."
      हात जोडून राजा म्हणाला, "माते, मी नेहमीच तुझा पुत्र आहे. त्याच नात्याने बोल."
      "पुत्र, मी जे सांगण्यासाठी आले आहे, ते तुझ्या इतर मातांचे सुद्धा सांगणे आहे. त्यांच्या वतीने मी तुला काही सांगणार आहे. एकाग्रतेने माझे सांगणे ऐक.
     आम्ही ऐकले आहे, तू आपल्या पत्नीच्या शुद्धतेच्या प्रमाणासाठी तिच्याकडून शुद्धतेची शपथ ग्रहण करवणार आहेस."
      खाली मान घालून राजा म्हणाला, "माता, ते सत्य आहे."       "पुत्र, किती वेळा अपमानित करणार तिला? ती शुद्ध असूनही लंकेमधे तिच्या चारित्र्याची शंका घेवून तिला अग्निपरीक्षा करण्यास भाग पाडलेस. दुसऱ्या वेळी गृहाबाहेर काढलेस."
      "माते, तुला माहीत आहे, प्रजेच्या मनात तिच्या विषयी शंका येवू नये यासाठी अग्निपरीक्षा आवश्यक होती. दुसऱ्या वेळी गृहस्थाश्रमातल्या चारित्र्यातले आदर्श प्रजेच्या समोर ठेवणे आवश्यक होते. राज कार्याच्या कर्तव्यापुढे माझे हात बांधले आहेत."
      "पुत्र, तुझ्या पत्नी विषयक तुझ्या मनात कसलीही शंका नाही. तुझे चरित्र गायन करणारे दोन्ही कुमार तुझे पुत्र आहेत हे तुला माहीत आहे. यज्ञमंडपातल्या अनेकांना ते मान्य आहे. तुझे बालरूप आजही ते विसरले नाहीत. अशा परिस्थितीत पत्नीच्या शुद्धतेसाठी तू शपथ ग्रहण का करत  नाहीस? तुझ्या प्रजेचा रावणावर नसला री तुझ्यावर विश्वास आहे."
      राजाला क्षणभर सुचेना आपल्या मातेला काय उत्तर द्यावे? थंड आवाजात तो म्हणाला, "माता, तिच्यासाठी मी प्रासादात सुद्धा वनवासातले आयुष्य जगतो आहे. तिची मूर्ती शेजारी बसवून यज्ञ करतो आहे. प्रजेच्या समोर ठेवायच्या आदर्श पालनासाठी तिला पुन्हा शपथ ग्रहण करावयास सांगण्याचे दिव्य करतो आहे. पावला पावलाला मी परीक्षा देतो आहे हे अनेकांना माहीत आहे. एकदा मी तिला त्यागले आहे. तिच्या शपथ ग्रहणाशिवाय पुत्रांना मी कसे आपले म्हणू? माते ते समोर दिसताहेत पण मी त्यांना आलिंगनात घेवू शकत नाही. ही माझी परीक्षा नाही का?"
      "तू म्हणतोस ह्यावर माझा विश्वास आहे. अर्थात तुला याची निश्चिती आहे का, ह्या शपथ ग्रहणा नंतर काही वर्षांनी प्रजाजन कसलीही शंका काढणार नाहीत?"       माताच्या ह्या बोलण्यावर क्षणभर थांबून राजाने आपले विचार गोळा केले. "माता, मी माझ्या प्रजाजनांना काहीही म्हणू शकत नाही. मला आठवते तुझ्या आणि पिताजींच्या वचनपूर्तीसाठी मी वनात निघालो होतो तेव्हां हीच प्रजा आम्हा तिघांबरोबर वनात येण्यासाठी अयोध्या सोडून दूरवर चालत होती. त्यांचे माझ्यावरचे ते प्रेम विसरणे कसे शक्य आहे? प्रजा आपल्या बुद्धीने चालते. त्यांच्याकडून मी जास्त अपेक्षा कशी करू?"
      छोटी राजमाता आपल्या विचारात भूतकाळात गेली.  "पुत्र, तू रघूवंशीच्या परंपरेचे पूर्णपणे पालन करतो आहेस. प्रजेसाठी जगतो आहेस. तू इथे राहून प्रजेला धर्माच्या मार्गावर चालण्यास प्रेरित करतो आहेस. वनवासींना उत्क्रांतीचा मार्ग मोकळा करून देण्यासाठी तू वनवास स्वीकारलास."       राजाने क्षणभर आपल्या मातकडे रोखून पाहिले. "माता, तुला काय म्हणायचे आहे? माझा वनवास म्हणजे पिताजींची वचनपूर्ति अथवा जनकल्याण?”
      एक दीर्घ उसासा सोडून राजमाता म्हणाली, "पुत्र, आजवर बाहेर कोणालाही माहीत नसलेली एक कथा तुला सांगते.
      त्या काळात तुझे पिता आपले राज्य व्यवस्थित संभाळत असले तरी वयाने थकले होते. एकदा बोलता बोलता त्यांनी तुझ्या राज्यभिषेकाचा विषय काढला. तुला राज्यावर बसवून काही दिवसांनी वानप्रस्थ स्वीकार करावा असा विचार त्यांच्या मनात होता. तुझ्या राज्याभिषेकाचा विचार ऐकून मी अतिशय आनंदित झाले होते. त्यावेळी वानप्रस्थाविषयी चर्चा करताना तुझ्या पित्याने चिंता व्यक्त केली की विंध्याच्या खाली दक्षिणेला राक्षसांचे वर्चस्व आहे. तिथे ऋषी-मुनींना यजन पूजन करणे कठीण झाले आहे. हा विषय घेवून दीर्घ वेळ चाललेल्या आमच्या चर्चेतून शेवटी रावणाचा वध झाला आणि दक्षिणेत शांतता स्थापीत झाली."
      आपल्या मातेचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झालेल्या राजाने विचारले, "माता, तू हे मला काय सांगते आहेस? रावण वधाचे खरे रचियता तुम्ही आहात. पिताजींच्या आणि तुझ्यामधली चर्चा मी सविस्तर ऐकू इच्छितो. मला माहीत आहे युद्धशास्त्र तू जितके बारकाईने जाणतेस तेवढेच तुझे राजकारणातला गुंता सोडवण्याचे कौशल्य महान आहे."
      "पुत्र, त्या गोष्टीला बराच काळ उलटला आहे. मुख्य लक्ष जिंकण्यासाठी किती गोष्टी पणाला लावाव्या लागल्या, किती गोष्टींचे बलिदान द्यावे लागले. मानसिक शक्तीला कसे पकडून ठेवावे लागले, भावनांना संभाळताना मनाची किती चिरफाड झाली, हे आठवले की आजसुद्धा मी घायाळ होते. सगळ्या घटनांमधे वाईट एवढेच वाटते की, आमच्या ज्येष्ठ पुत्रवधूला या मधे बरेच काही झेलावे लागले. तिचे गृहस्थ जीवन घटीकापात्रातल्या वाळूप्रमाणे घरंगळून गेले. समाजाच्या उत्क्रांतीच्या, सुधारणेच्या पायाचा चिरा तिला व्हावे लागले. वास्तविक तुझ्या पित्याच्या आणि माझ्या चर्चेत ती नव्हती. प्रमुख तू होतास. ती तुझी पत्नी होती एवढेच."
      “माता ती चर्चा मला ऐकायची आहे. तु सविस्तर सांग.” ग
      “ऐक पुत्र.” XXX
      राजमाता भूतकाळात गेली. सजलेला तिचा कक्ष दिसत होता. सौभाग्य अलंकार घातलेली ती आपल्या पतीची प्रतीक्षा करत होती. अयोध्येच्या महाराजांनी तिच्या कक्षात प्रसन्न मुखाने प्रवेश केला होता. पतीचा आदर सत्कार करून तिने त्याला आसनावर बसवले होते. वार्तालाप करताना पती आपल्याच विचारात तिला म्हणाला होता, "प्रिये, ह्या राजप्रासादात तुम्हा तिघी स्त्रियांबरोबर गृहस्थाश्रमातली किती वर्षे उलटली हे कळले नाही. सुरवातीचा काळ पुत्र जन्माची प्रतीक्षा करण्यात गेला. अनेक तपस्येनंतर ईश्वराने आपली झोळी पूर्ण आनंदाने भरली. चार सुयोग्य पुत्र आपल्या गृहात रांगू लागले. एकेक पाऊल टाकायला शिकले. चालता चालता कधी मोठे झाले कळलेही नाही. आज चार पुत्रवधू आपल्या घरात वावरत आहेत. तुला असे नाही वाटत आता आपला मोह आवरता घ्यावा? आपले वानप्रस्थाचे दिवस आले आहेत?"
      "आर्यपुत्र, अयोग्य विचार तुमच्या मुखातून निघत नाही. पुत्राच्या राज्याभिषेकाची तयारी करा. आम्ही तिघी तुमच्याबरोबर आनंदाने वनगमन करू."
      "तुम्ही तिघी माझ्या स्त्रिया आहात. मी तुम्हा तिघींवर सारखेच प्रेम करतो हे सत्य आहे. परंतु, तू त्या दोघींचे विचार तू कसे सांगू शकतेस?"
      "महाराज, आमच्या मधले गुपित ऐकायचा प्रयत्न करू नका. आम्ही तिघी एक मनाने तुमची सेवा करतो."
      महाराजसुद्धा त्यावेळी हंसले होते. "देवी, गृहस्थाश्रम संपवायची वेळ आली आहे. आता मी तुमचे गुपित ऐकायला हरकत नाही." 
      "महाराज, मी परिहास करत होते. आमच्यामधे कुठलेही गुपित नाही. ज्येष्ठ महाराणी सात्विक विचारांची आहे. तिने आम्हा दोघींना संभाळले आहे. मधली महाराणी सौम्य स्वभावाची आहे. बुद्धिमान असून हंसमुख आहे. कोणालाही कसे आपले करावे हे तिच्याकडून शिकावे. मी जशी आहे तुमच्या समोर आहे. त्यामुळे मी म्हणते आम्ही तिघी तुमच्या वानप्रस्थाच्या विचारांचा आनंदाने स्वीकार करू. प्रासादाच्या ह्या वर्दळीपासून दूर वनाची शांती मला आतापासून भुरळ घालते आहे. आर्यपुत्र, हिमालयाच्या पायथ्याशी असलेली वनश्री मी पुष्कळ पाहिली आहे. ह्यावेळी आपण नर्मदा ओलांडून दक्षिणेला जायचे आहे. तिकडे महर्षी अगस्ती, तसेच इतर अनेक महान तपस्वी दर्शन घेता येईल. त्यांच्या सहवासात काही दिवस रहाता येईल. तिथेच आश्रम भारून आपले उर्वरित आयुष्य काढता येईल."
      "प्रिये, मी फक्त विचार बोलून दाखवला. तू सरळ दंडकारण्यात पोहचलीस. तिकडे जाण्यात एक अडथळा आहे. दंडकारण्य सुरक्षित नाही. लंकेचा राक्षस राजा रावणाच्या अनुयायी राक्षसांचे तिथे वर्चस्व आहे. ऋषी-मुनींचे जप-तप, यजन-पूजन सर्व त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते."
      अयोध्येची छोटी महाराणी आपल्या पतीचे बोलणे ऐकून विचारात पडली. आपल्या विचारांना एकत्र करत पतीकडे रोखून पहात ती म्हणाली, "आर्यपुत्र, ही गोष्ट तुम्ही मला सांगता आहात? कित्येक मांडलिक राजांचे अधिपती, प्रसंगी देवराज इंद्र असूरांशी होणाऱ्या युद्धात ज्यांना मदतीला बोलावतात असे शूरवीर मला सांगत आहेत की, दंडकारण्य सुरक्षित नाही. त्या शौर्याचा काय उपयोग? देवराज इंद्राशी असलेल्या त्या मैत्रीचा तरी काय उपयोग? 'पृथ्वीपती' ह्या त्यांच्या उपाधीचा तरी काय उपयोग? ज्यांच्या अधिकारातली जमीन सुरक्षित नाही. महाराज, प्रथम दंडकारण्यातील राक्षसांच्या विनाशा विषयीविचार करा. बाकीच्या गोष्टी नंतर होतील."
      "प्रिये, तू एकदम गंभीर झालीस. तुला वाटते तेवढे हे काम सहज नाही. तसे असते तर दंडकारण्य केव्हांच सुरक्षित झाले असते."

No comments:

Post a Comment