Friday, January 13, 2012

लोकापवाद रामायणातला: एक विचार भाग ३

      पत्नीच्या बोलण्यातील खोच लक्षात येवून अयोध्यापतीने क्षणभर विचार केला. "हे अयोध्येच्या महाराणी तू म्हणतेस ते सत्य आहे. ज्येष्ठ पुत्राला राज्यावर बसवून मी निश्चिंतपणे युद्धासाठी बाहेर पडेन. दंडकारण्य सुरक्षित होईल."
      "महाराज, दंडकारण्याची केवळ सुरक्षा महत्वाची नाही. विंध्याच्या दक्षिणेला संस्कृती स्थापन करण्याची आहे. गोष्ट फक्त ऋषी-मुनींच्या तपस्येची नाही. तिथे रहाणाऱ्या अरण्यवासींची आहे. त्यांना वैदिक संस्कृतीच्या धारेत आणून सोडण्याची आहे. एका स्वस्थ राज्य स्थापनेची आहे. ही गोष्ट बलाढ्य रावणाला जिंकल्याशिवाय शक्य नाही. कठीण तपस्या करून अनेक वरदानाचा धनी असलेला रावण. महाराज, ज्याने इंद्राला बंदी केले होते, त्याला जिंकणे जमेल तुम्हाला?"
      "तू सांगतेस ते धोके मला माहीत आहेत. सूर्य वंशात जन्मलेला मी, आजवर मी युद्धात हार माहीत नाही."
      "अयोध्यापती आणि लंकापती यामधे मोठा फरक आहे. अयोध्यापती मानवी गुरुकुलात युद्धकला शिकले आहेत. पुढे अभ्यास करून त्यांनी ती कला वाढवली आहे. लंकापतीने अजिंक्य रहाण्यासाठी कठीण तपस्या करून ब्रह्माकडून वरदान आणि भगवान शंकराकडून दिव्य अस्त्र तसेच शस्त्र मिळवले आहेत."
      "हे सर्व मला माहीत आहे. आता राज्य संभाळण्यासाठी माझे चार पुत्र आहेत. अयोध्ये बाहेर पडून सारे युद्ध कौशल्य पणाला लावून समाजाच्या उद्धारासाठी मी युद्ध करीन."
      "आर्यपुत्र, विवाह झाल्यापासून मी तुमच्या सहवासात रहाते आहे. तुमच्या शौर्याविषयी मला दुसऱ्या कोणाकडून ऐकण्याची आवश्यकता नाही. महाराज, मी नम्रपणे एक निवेदन करते, ते तुम्ही शांतीपूर्वक ऐका."
      "सांग प्रिये, तुझ्यासारखी व्यवहार कुशल स्त्री अयोग्य विचार मांडणार नाही एवढे मला माहीत आहे."
      "हे अयोध्यापती, आधी माझे म्हणणे ऐकून घ्या. रावणाला मारून दंडकारण्य मुक्त करण्याची शक्ती तुमच्यामधे नाही. तुमची अवस्था आता युवा राहिली नाही. तपस्या करून वरदान प्राप्त करावे इतका समय आपल्याजवळ नाही. रावण म्हणजे शंबरासूर नाही."
      "देवी, तुझे म्हणणे सत्य असले तरी आता मी मागे वळून पहाणार नाही. उद्या मी राज्यसभेत सर्व सामंत राजांसमोर ज्येष्ठ पुत्राच्या राज्याभिषेकाचा विषय काढतो."
      "महाराज, माझे म्हणणे पूर्णपणे ऐकून घ्या. त्यानंतर जो निर्णय घ्यायचा तो घ्या. रावणाशी युद्ध करायला कदाचित कमी पडाल, परंतु तुमच्या ज्येष्ठ पुत्रामधे ते सामर्थ्य आहे."
      "हे काय बोलतेस प्रिये ? कुठे आपला सुकुमार पुत्र? कुठे बलाढ्य रावण? दोघांची बरोबरी करणे योग्य नाही."
      "आर्यपुत्र, आपल्या पुत्राचा जन्म दिव्य आशीर्वादाने झाला आहे. तो सुकुमार दिसत असला तरी त्याने शिवधनुष्य तोडले आहे. एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय करणाऱ्या परशुरामांना जिंकले आहे."
      "ह्या गोष्टी सर्वांना माहीत आहेत. तरीही तेवढ्याने काय होणार? रावण त्या पलीकडचा आहे."
      "महाराज, तुम्हाला तुमच्या पुत्राचा अभिमान वाटला पाहिजे. कोवळ्या वयात त्याला ऋषी विश्वामित्रांनी यज्ञाच्या रक्षणासाठी नेले होते. सर्व सैन्यानिशी तुम्ही जाण्यास तयार होता. त्यांनी तुम्हाला नकार दिला होता. केवळ दोन कुमारांना बरोबर घेवून ते निघून गेले. भगवान शंकराची  आराधना करून त्यांनी सर्व प्रकारची अस्त्रे मिळवली होती. ती सर्व अस्त्रे त्यांना तुमच्या ज्येष्ठ पुत्राला दिली आहेत. यज्ञ रक्षण हे केवळ निमित्त असावे. त्रिकालदर्शी ऋषींचा मुख्य हेतू कुमारांना अस्त्र प्रदान करण्याचा असेल. एखादी साधारण व्यक्ती सुद्धा सांगू शकेल की अयोध्येच्या रक्षणासाठी एवढ्या दिव्य अस्त्रांची आवश्यकता नाही. महाराज, आपल्या ज्येष्ठ पुत्राचा अभिषेक करण्यापेक्षा त्याला दंडकारण्यात पाठवा. तुमचा पुत्र तुमच्यापेक्षा चार पावले पुढे आहे."
      "महाराणी, तुझे म्हणणे मला मान्य आहे. अर्थात आपला पुत्र दंडकाण्यात जाईल परंतु आता नाही." 
      "महाराज, तुम्ही सर्व समजता आहात, तरीही असे बोलता आहात."
      "सध्या मला एकच कर्तव्य दिसते आहे. पुत्राचा राज्याभिषेक करून दंडकारण्यासाठी अयोध्या सोडायची."
      "महाराज, तुम्हाला राज्याची धुरा संभाळायची नसेल तर तुमच्या दुसऱ्या पुत्राला हे काम सांगा. आपल्या ज्येष्ठ पुत्राशिवाय दंडकारण्यात जाण्यास कोणीही योग्य नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगते."
      "देवी, हे काम दीर्घ समय चालणारे आहे. ह्याचा काय अंत होईल हे सांगता येत नाही. कुमारचे वय कोवळे आहे. तो विवाहीत आहे. त्याच्या वधूचे काय?"
      "त्या दोघांना एकमेकांपासून दूर करण्याचे पाप माझ्या मनात नाही. ती त्याच्या बरोबर वनात जाईल. एकदम युद्धाला तोंड फुटणार नाही. आपल्या पुत्राला चारीकडे फिरून दक्षिणच्या परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. संस्कृतीची स्थापना इतक्या लवकर होणार नाही. वनातून फिरताना आपल्या पत्नीचे रक्षण करण्यास तो समर्थ आहे. माझ्या विचाराने चौघा बंधुंमधे इतके प्रेम आहे की कोणी एक त्याच्या बरोबर अरण्यात अवश्य जाईल."
      "देवी, विषय कुठला होता आणि आपण कुठे वहावत आलो."
      "विचारांच्या ह्या वहाण्यामधे तुम्ही मला दंडकारण्यात नेवून सोडले. ऋषी-मुनींपासून सामान्य लोकांच्या कष्टाची जाणीव दिली. माझ्या मनाला आता स्वस्थता नाही."
      "देवी, मला वाटते हा विषय इथे थांबवावा. रावणाचे आयुष्य सामान्य मानवाचे नाही. त्याच्या जन्माला शेकडो वर्ष झाली आहेत. अजून थोडी वर्षे तो जगला तरी फारसा फरक पडणार नाही. तुझ्या विचाराप्रमाणे पुढे पहाता येईल."
      "आर्यपुत्र, तुमचे सांगणे मी ऐकले. आता माझे सांगणे तुम्ही ऐका. आजचा आपला वार्तालाप ह्या कक्षाच्या आत गुप्त राहील. उद्या काहीही झाले तरी याचा उच्चार कधीही कुठेही करायचा नाही."
      अयोध्येचे महाराज हंसले, “मी वचन दिले तुला.”
XXX
      छोटी राजमाता आपल्या आठवणीतून बाहेर आली.
      "पुत्र, तुझ्या पित्याशी माझी झालेली चर्चा एवढी होती. ह्या चर्चेनंतर काही महिने उलटले. दंडकारण्याचा विषय आमच्या मनात रेंगाळत होता एवढेच. तुझ्या पित्याचे तुझ्यावर असलेले प्रेम तुला दंडकारण्यात पाठवण्यास तयार नव्हते. तुझ्याशिवाय रावणाशी टक्कर घेईल असा दुसरा कोणी नाही हे सुद्धा त्यांना माहीत होते. विचारांच्या ह्या टकरावात शेवटी पितृप्रेम जिंकले. पुत्र तू मनमोही आहेस. प्रत्येकाचे मन मोहून घेतोस. तुझे पिता कसे तुझ्यापासून दूर रहाणार होते ? एक मी निष्ठुर होते. ऋषी-मुनींचे यजन-पूजन आणि अरण्यवासी समाजाच्या उत्क्रांतीचे स्वप्न माझ्या मनाला सोडू शकत नव्हते."
      अयोध्येच्या राजाने आपले दोन्ही हात जोडले. "माता, समजाच्या उत्क्रांतीची अशी भव्य स्वप्न पहाण्याची शक्ती त्याच्यामधे असते, ज्यांना इच्छा-अपेक्षा, मोह-माया यांची चिरफाड करून, बाह्य मनाचे कवच फोडून अंतर मनात उतरता येते. माता तू दुःखी होवू नकोस."
      "पुत्र, मी जे काही केले त्याचे परिणाम पहाण्यासाठी मी जिवंत आहे. तुझ्या नावाचा जप करत तुझे पिता ह्या पृथ्वीलोकातून निघून गेले आहेत. तरी सुद्धा तुला सांगावेसे वाटते, आपल्या पुत्रवधूची चाललेली चिरफाड त्यांना दुःखी करून गेली असती."
      "माता, तुमच्या सर्वांप्रमाणे माझ्या मनाची सुद्धा चिरफाड होते आहे. ही गोष्ट मी तुझ्या समोर मान्य करतो. माता, मी तुला वचन देतो की, ही तिची शेवटची शपथ असेल. पुन्हा ती परिक्षीत होणार नाही."
      "पुत्र, तू म्हणतोस तसेच होवो. आता मला अनुमती दे. तुझ्या इतर माता माझी प्रतीक्षा करत असतील."
      "माता, जाण्या आधी एक सांगून जा, इतर दोघी मातांना ही गोष्ट माहीत आहे का?"
      "आम्ही सर्व तुम्हा तिघांना भेटायला चित्रकुटला निघालो होतो त्या रात्री मी हे सर्व त्यांना सांगितले होते. अर्थात ही वार्ता गुप्त राहील याची आम्ही काळजी घेतली होती."
      अयोध्येच्या संयमी राजाला विचारचक्रात सोडून त्याची माता तिथून निघून गेली.
     त्या रात्री यज्ञप्रांगणात वास्तव्य करणाऱ्या रघूवंशातील कोणालाही निद्रा आली नाही. प्रत्येकजण आपापल्या विचारात जागे होते. रात्री देवी प्रत्येकाचे विचार ऐकत होती, पहात होती. उद्या काय घडणार हे तिला माहीत नव्हते. दुसऱ्या रात्री संध्यादेवी कडून तिला ते कळणार होते. अस्वस्थ मनःस्थितीत सर्वांना उषादेवीच्या हातात सोडून ती हळूच तिथून निघून गेली.

No comments:

Post a Comment